Vachmi



घालीन लोटांगण वंदीन चरण
(Ghalin Lotangana Vandin Charan)

घालीन लोटांगण हे स्तवन अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. ही प्रार्थना सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.

ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे.

ही प्रार्थना कोणी एका कवीनी केलेली नाही. या पाचही कडव्यांचे रचनाकार हे वेगवेगळे आहेत. तसेच या सर्व कडव्यांच्या रचना वेगवेगळ्या कालखंडात केल्या गेल्या आहेत. वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे.
या प्रार्थनेत एकूण जी पाच कडवी आहेत ती सध्या आपण म्हणतो त्याप्रमाणे पूर्वी ती एकदम म्हटली जात नसावी. प्रथम पहिले कडवे म्हटले जात असावे. नंतर कालांतराने दुसरे, तिसरे, चौथे व पाचवे कडवे म्हणण्याची प्रथा पडली असावी.
पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत.
ह्या कडव्यां मधे गणपतीला उद्देशून कोणतेही कडवे नाही. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हटली जाते.



पहिले कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे. संत नामदेव ( इ. सन १२७० —इ. सन १३५० ) हे वारकरी संप्रदायाचे एक महान संतकवी होऊन गेले.
घालीन लोटांगण वंदीन चरण
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे
प्रेमें आलिंगन आनंदे पूजीन
भावे ओवाळीन म्हणे नामा ॥

विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात,
तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन.
माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहेन
तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन, तुला आनंदाने पूजीन
अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन.

पुढचे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे. हे सातव्या-आठव्या शतकात लिहिले गेले आहे.

त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देव देव ॥

तूच माझी माता व पिता आहेस.
तूच माझा बंधू आणि मित्र आहेस.
तूच माझे ज्ञान आणि धन आहेस.
तूच माझे सर्वस्व आहेस.

या नंतरचे कडवे श्रीमद् भागवत पुराणातील आहे. श्रीमद्भागवताचा काळ म्हणजे सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. महर्षी व्यासांनी हे लिहिलेले आहे. हा श्लोक राजा कुलशेखर यांनी रचलेल्या मुकुंदमाला या स्तोत्रात देखील आढळतो.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा
बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात ।
करोमि यद्येत सकल परस्मै
नारायणापि समर्पयामि ॥

श्रीकृष्णाला उद्देशून - माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये,
माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती
यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व
हे नारायणा, मी तुला समर्पित करीत आहे.

नंतरचे कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.

अच्युतं केशवं रामनारायम्
कृष्ण दामोदरं वासुदेवं हरी ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकी नायकं रामचंद्र भजे ॥

मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला,
त्या श्रीकृष्णाला, त्या दामोदराला, त्या वासुदेवाला, त्या हरीला,
त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला,
आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला.

या पुढचे कडवे हा सोळा अक्षरी मंत्र 'कलीसंतरण' या उपनिषदातील आहे. हे उपनिषद कृष्ण यजुर्वेदात आहे. ब्रह्मा आणि ऋषी नारद यांच्यातील हा एक सुंदर संवाद आहे. कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे.

हरे राम हरे राम,
राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण,
कृष्ण कृष्ण हरे हरे ॥